पृथ्वीच्या कक्षेत थोड्या दिवसासाठी येतोय पाहुणा चिमुकला चंद्र

फोटो साभार सिनेट

पृथ्वीच्या कक्षेत अनेक उल्कापिंड वारंवार येत असतातच पण त्यात आता एका चिमुकल्या चंद्राची भर पडणार आहे. हा चंद्र पृथ्वीच्या कक्षेत काही दिवसांसाठी मुक्काम टाकेल असा अंदाज अंतराळ वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. २०२० एसओ असे या वस्तूचे नामकरण केले गेले असून ऑक्टोबर महिन्यात तो पृथ्वीच्या जवळ असेल आणि मे २०२१ पर्यंत त्याचा मुक्काम पृथ्वीच्या कक्षेत राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पृथ्वीभोवती तिचा एक चंद्र फिरतो आहेच शिवाय काही उल्कापिंड सुद्धा पृथ्वीच्या कक्षेत फिरत असतात त्यांना मिनी मून असे म्हटले जाते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात बांधून राहिलेल्या कोणत्याची नैसर्गिक वस्तूला चंद्र असे संबोधन आहे. आता अंतराळ तज्ञांना पृथ्वीकडे येणारा छोटा चंद्र आढळला असून १ डिसेंबर रोजी तो पृथ्वीपासून ५० हजार किमी अंतरावरून दूर जाईल आणि २ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा परतेल असा अंदाज आहे. अर्थात आगामी महिन्यात ही परिस्थिती बदलू शकेल.

तज्ञांना या चंद्राबाबत एक अजब गोष्ट जाणवली आहे ती अशी की स्पेस रॉक किंवा उल्केपेक्षा या चंद्राचा वेग खुपच कमी आहे. त्यामुळे हा चिमुकला चंद्र मानवनिर्मित तर नाही ना अशीही शंका व्यक्त होत आहे. स्पेस रॉकचा सरासरी वेग ११ किमी ते ७२ किमी प्रतीसेकंड असतो. पण या चंद्राचा म्हणजे २०२० एसओ चा वेग मात्र ०.६ किमी प्रती सेकंड इतकाच आहे.