माता देवकीसह येथे विराजमान आहे कृष्णकन्हैया

सध्या सुरु असलेला अधिक मास म्हणजे विष्णू उपासनेचा महिना. विष्णूचा आठवा अवतार म्हणजे कृष्णकन्हैया. भारतात कृष्णाची हजारो मंदिरे आहेत त्यात अनेक ठिकाणी कृष्णासोबत राधा आहे. कृष्णाची माता देवकी. मात्र जन्म झाल्याबरोबर या माता पुत्राची ताटातुट झाली होती. त्यामुळे देवकी आणि कृष्ण यांचे एकत्रित मंदिर सहज आढळत नाही. गोव्याच्या पणजी पासून १७ किमी अंतरावर देशातील एकमेव देवकी कृष्णकन्हैया मंदिर आहे. देवकी कृष्ण रवळनाथ मंदिर असे या मंदिराचे नाव आहे.

हे मूळ मंदिर वास्तविक मांडवी नदीतील चोदन नावाच्या बेटावर होते. पण पोर्तुगीज शासकांनी हे मंदिर नष्ट केले. १५३० व १५४० इसवी सन पूर्वीच हे मंदिर स्थानांतरित केले गेले आणि १५४० ते १५६७ या काळात मार्सेल म्हणजे सध्याच्या जागी पुन्हा बांधले गेले. त्यामुळे या मंदिराचे बांधकाम पारंपारिक हिंदू मंदिराप्रमाणे नाही तर ते एखाद्या चर्च सारखे दिसते. सुरवातीला हे मंदिर खुपच छोटे होते पण नंतर १८४२ साली ते पुन्हा बांधले गेले.

मंदिराच्या गर्भगृहात देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्ती आहेत. देवकीच्या हातात बालकृष्ण आहे. तसेच देवकीच्या मूर्तीच्या दोन्ही पायात सुद्धा उभी बाळकृष्ण मूर्ती आहे. या प्रकारची मूर्ती अद्वितीय मानली जाते. मूर्ती काळ्या पाषाणात अतिशय कुशलतेने कोरल्या गेल्या आहेत. याच बरोबर या मंदिरात भौमिका देवी, लक्ष्मी रवळनाथ, कात्यायनी, धाडा शंकर यांच्याही मूर्ती आहेत.