धक्कादायक निरीक्षण, डेंग्यू रुग्ण करोनाला सहज देताहेत मात

करोना संदर्भात जवळजवळ रोज नवी निरक्षणे आणि संशोधने सुरु असून त्याचे अहवाल प्रसिद्ध होत आहेत. या मालिकेत एक आश्चर्यकारक निरीक्षण नोंदविले गेले असून त्यामुळे करोना संदर्भातले गुढ अधिक गहिरे झाले आहे. या निरीक्षणात असे दिसून आले आहे की ज्या ठिकाणी डेंग्यूचे संक्रमण जास्त प्रमाणात आहे तेथे करोनाचा प्रसार कमी प्रमाणात होत आहे. डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या शरीरात जी प्रतीपिंडे तयार होतात, त्यामुळे करोनाची वाढ थांबविली जात असल्याचे दिसून आले आहे.मेरठ येथील वैद्यकीय महाविद्यालयातील मायक्रोबायोलोजीस्ट डॉ. अजित गर्ग यांनी ही माहिती दिली.

गर्ग म्हणाले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी तर्फे भारतात या संदर्भात पाहणी केली गेली. त्यावेळी डेंग्यू प्रतीपिंड करोना संक्रमण थांबवीत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे ब्राझील आणि युके विश्वविद्यालयाच्या आणि इस्रायलच्या क्लिनिकल इन्फेक्शस डिसीज च्या ताज्या अहवालात हिच बाब पुढे आली आहे. भारत आणि ब्राझील मध्ये डेंग्यूचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे कदाचित करोना साथी मध्ये सुद्धा अन्य युरोपीय देशांच्या तुलनेत करोना मृत्यूचे प्रमाण कमी नोंदविले गेले असावे.

संशोधक डेंग्यू आणि करोना हॉटस्पॉट मधील जी आकडेवारी येत आहे त्यावर रिसर्च करत आहेत. युके मधील वैद्यानिक डेंग्यूसाठीची लस करोना संक्रमणाचा धोका कमी करू शकेल अश्या अनुमानापर्यंत आले आहेत. करोनाची लस येईपर्यंत डेंग्यू लस काही प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती वाढवून संक्रमणाचा धोका कमी करू शकेल असा निष्कर्ष काढला जात आहे. अर्थात डेंग्यूची लस सध्या फक्त २० देशात उपलब्ध आहे.

या निरीक्षणात असेही दिसून आले आहे की पूर्वी कधीकाळी डेंग्यूची लागण झालेल्या एखाद्या व्यक्तीला तपासणीत करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली तर तो रिपोर्ट चुकीचा असू शकतो.