चीनला कोणत्याही ‘युद्ध’ अथवा ‘शीतयुद्धात’ पडण्यात रस नाही – शी जिनपिंग


चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलताना अप्रत्यक्षरित्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेवर आणि भारतासोबत सुरू असलेल्या सीमावादाबाबत भाष्य केले आहे. जिनपिंग म्हणाले की, चीनला कोणत्याही देशासोबत युद्ध अथवा शीतयुद्ध करायचे नाही. जगाने सभ्यतेच्या लढाईत पडू नये आणि मोठ्या देशांनी मोठ्या देशांप्रमाणेच काम करावे.

पुर्व लडाख भागात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावाबाबत जिनपिंग महासभेत म्हणाले की, चीन कधीही आपले वर्चस्व वाढविण्याचा किंवा अन्यत्र आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करणार नाही. चीन आपले वाद आणि मतभेद चर्चेद्वारे सोडवणे सुरू ठेवेल.

पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये विस्तारवादाचे युग संपले आहे, असे म्हणत चीनला इशारा दिला होता. यावर देखील अप्रत्यक्षरित्या बोलताना जिनपिंग म्हणाले की, आमचा देश बंद दारा मागे विकास करणार नाही. आम्ही वेळेप्रमाणे स्थानिक प्रसार प्रथम आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रसारला मजबूत करू इच्छितो. यामुळे चीनच्या आर्थिक विकासाला देखील जागा मिळेल आणि जागतिक अर्थव्यवस्था व विकासावर देखील परिणाम होईल.

कोरोना व्हायरसवरून होणाऱ्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, आपल्या या काळात एकमेकांसोबत उभे राहायला हवे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली विज्ञानाचे अनुसरण करायला हवे व या मुद्यावर राजकारण करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांना नाकारायला हवे.