टाईमच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदी, आयुष्मानसह ‘या’ आजींचा देखील समावेश


जगातील सर्वात प्रतिष्ठित मासिकांपैकी एक असलेल्या टाईमने 2020 मधील सर्वात प्रभावी व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते, ज्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींचा समावेश केला जातो. जगातील सर्वात प्रभावी नेत्यांमध्ये पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्थान मिळवले आहे.

या यादीमध्ये शाहीन बागमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करण्यासाठी झालेल्या प्रदर्शनाचा चेहरा बनलेल्या बिल्किस दादीचे देखील नाव आहे. या प्रदर्शनामुळे शाहीन बागच्या या आजींनी जगभरात नाव मिळवले. 82 वर्षीय बिल्किस यांना टाईम मासिकाने आपल्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले आहे. याशिवाय या यादीत बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा, रविंद्र गुप्ता आणि भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांचा समावेश आहे.

टाईमच्या या यादीत जगभरातील दोन डझन प्रभावशाली नेत्यांचा देखील समावेश आहे. मात्र भारतातील नरेंद्र मोदी हे एकमेव नेते या यादीत आहे. तसेच, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, कमला हॅरिस, जो बाइडन, एंजेला मर्केल आणि नॅन्सी पॉलोसी सारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.