कोरोना : सध्या काम सुरू असलेल्या लशी परिणामकारक ठरतील याची खात्री नाही – डब्ल्यूएचओ


कोरोना व्हायरसवर मात करेल अशा लसीची सर्वचजण वाट पाहत आहेत. यातच आता कोरोना प्रतिबंधक ज्या लसींवर सध्या काम सुरू आहे, त्या लसी परिणामकारक ठरतीलच याची कोणतीही खात्री नसल्याचे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम यांनी म्हटले आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख म्हणाले की, आम्ही याची कोणतीही हमी देऊ शकत नाही की जगभरात ज्या लसींवर काम सुरू आहे, त्या खरचं परिणामकारक ठरतील. आम्ही अनेक लसींची चाचणी करत आहोत. आशा हीच आहे की लवकरच एक सुरक्षित आणि प्रभावी लस मिळेल. त्यांनी माहिती दिली की, जवळपास 200 लसींवर काम सुरू आहे. या लसी क्लिनिकल आणि प्री-क्लिनिकल ट्रायलमध्ये आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने ग्लोबल वॅक्सीन एलायन्स ग्रुप आणि एपिडेमिक्स प्रिपेयर्डनेस इनोव्हेशन्ससोबत मिळून कोवॅक्स नावाची योजना बनवली आहे. जेणेकरून भविष्यात सर्व गरजू देशांना समान लस पुरवठा करत येईल. याबाबत ते म्हणाले की, कोवॅक्सद्वारे सरकार लस तयार करण्यासोबतच, गरजू देशांना लस उपलब्ध होईल हे देखील सुनिश्चित करेल.

ट्रेडोस अधनोम म्हणाले की, कोव्हिड-19 वरील लस शोधणे ही स्पर्धा नसून, हे एक सहकार्य आहे. कोवॅक्सची सुविधा महामारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत करेल. सोबतच लोकांचे प्राण वाचवेल आणि अर्थव्यस्था सुरळित करण्यासाठी मदत करेल.