चीनने बळकावली नेपाळची जमीन, विरोधात रस्त्यावर उतरले लोक


एकीकडे भारतासोबत सीमेवर तणाव सुरू असताना आता चीनने नेपाळच्या जमिनीवर देखील कब्जा केला आहे. चीन नेपाळच्या जमिनीवर ताबा मिळवून तेथे भवन उभारले आहे. याला काठमांडू येथील नागरिक जोरदार विरोध करत आहेत. काठमांडू येथील चीनच्या दूतावासाबाहेर युवकांनी विरोध प्रदर्शन करत जोरदार घोषणाबाजी केली. नेपाळच्या हुम्ला जिल्ह्यातील सीमा स्तंभापासून 2 किमी अंतरावरील जमिनीवर ताबा मिळवत चीनच्या सैनिकांनी 9 भवनांची निर्मिती केली आहे. तेथे नेपाळच्या नागरिकांना प्रवेशास देखील बंदी घालण्यात आली आहे.

नेपाळच्या हुला जिल्ह्याच्या मुख्यालयापासून काही अंतरावरील लाप्चा भागात चीनने बेकायदेशीररित्या इमारत उभारली आहे. चीनचा दावा आहे की जेथे इमारत बांधली आहे, तो त्यांचाच भाग आहे. तर नेपाळचा दावा आहे की, 11 नोव्हेंबरला सीमा स्तंभ गायब करण्यात आले व चीनने येथे अतिक्रमण केले. नेपाळी अधिकारी तेथे पोहचल्यानंतर चीनने इमारतीच्या ठिकाणी चर्चा करण्यास देखील नकार दिला.

चीनी दूतावासाने याबाबत म्हटले आहे की, चीनद्वारे नेपाळच्या जमिनीवर अतिक्रमण करून इमारत बांधण्यात आल्याची माहिती खोटी आहे. नेपाळकडे पुरावा असल्यास चीन चर्चा करण्यास तयार आहे. काही महिन्यांपुर्वी चीनने नेपाळच्या गोरखा जिल्ह्यातील रुई गावावर देखील दावा केला होता. यावरून नेपाळमध्ये राजकारण चांगलेच तापले होते.

नेपाळच्या विरोधी पक्षाचा आरोप आहे की, नेपाळ-चीनमधील 1414.88 किमी सीमेवरील 98 खांब गायब आहेत. मात्र दुसरीकडे नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली यांना चीनसोबत कोणताही सीमावाद नसल्याचे म्हटले होते.