मातोश्रीमध्ये बसून राज्याचा कारभार हाकता येत नाही – चंद्रकांत पाटील


मराठा समाजासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे भाजपने स्वागत केले असून, ओबीसी समाजाला मिळणारे सर्व लाभ मराठा समाजाला मिळावेत ही भाजपची मागणी होती, त्यानुसार महाविकास आघाडीने मराठा समाजासाठी अनेक चांगले निर्णय घेतले, त्याचे आम्ही स्वागत करतो, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. सोबतच त्यांनी मातोश्रीमध्ये बसून राज्याचा कारभार हाकता येत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे.

पावसामुळे तुंबलेल्या मुंबईवरून देखील चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काम दिल्याने मुंबईची अशी अवस्था होत आहे.  मुंबई पालिका कायम शिवसेनेकडे आहे. नागरी सुविधा देण्यात मुंबई पालिका कमी पडते. शिवसेनेचे नेहमी आलेला दिवस ढकलण्याचे काम चालले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत चंद्रकांत पाटील म्हणाले की, मातोश्रीमध्ये बसून राज्याचा कारभार हाकता येत नाही. संकट काळात मुख्यमंत्र्यांनी दौरे काढून यंत्रणेला जाग करणे गरजेचे असते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे यंत्रणा कामाला लागते. मात्र आमचे मुख्यमंत्री कधी मातोश्रीतून बाहेर पडत नाहीत. बैठका वर्षा किंवा मंत्रायलात घ्यायला हव्यात. मात्र यांच्या बैठका महापौर बंगल्यात होतात.