पत्र मिळाले पण तब्बल १०० वर्षांनंतर

फोटो साभार न्यूज वन

काही काळापूर्वी आपल्याकडची ख्याली खुशाली अथवा अन्य खबर कळविण्यासाठी पत्रे लिहिली जात होती. आता त्याची जागा फोन, इमेल, मेसेजने घेतली आहे. पण पोस्टकार्ड लिहून जे समाधान मिळत असे त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही असे अनेकांचे मत आहे.

अमेरिकेतील मिशिगन येथे राहणारया ब्रिटनी किच या ३० वर्षीय महिलेच्या मेल बॉक्स मध्ये तिला नुकतेच एक पत्र मिळाले आणि तिच्यावर थक्क होण्याची वेळ आली. कारण हे पत्र १०० वर्षापूर्वी पाठविले गेले होते, पत्रावरचा शिक्का सांगतो हे पत्र २९ ऑक्टोबर १९२० साली पोस्ट केले गेले आहे. अर्थात हे पत्र ज्याच्या नावाने आहे त्याला ब्रिटनी ओळखत सुद्धा नाही. पण इतक्या उशिरा आलेले हे पत्र त्याच्या मूळ मालकाला मिळाले पाहिजे असे तिला वाटते म्हणून तिने फेसबुकवर ते पोस्ट केले असून मूळ मालकाला शोधण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.

या पत्रात एका काळ्या मांजराचा फोटो आहे. त्याच्या हातात एक झाडू आहे. शिवाय एक घुबड आणि एक महिला आहे. हालोवीन निमित्ताने हे पत्र लिहिले गेले असावे. रोथ मॅक्वीन नावाच्या माणसाला ते लिहिले गेले आहे आणि पत्रावरचा पत्ता ब्रिटनीच्या सध्याच्या घराचा आहे. ‘ प्रिय कझिन, हे कार्ड तुला आवडेल असे वाटते. आम्ही बरे आहोत. आईचे पाय दुखतात. येथे थंडी खूप आहे. इतिहासाचा अभ्यास मी आत्ताच पूर्ण केला आणि आता झोपायला जाणार आहे. आई मला तुमच्या घराचा पत्ता सांगते आहे. आजी आजोबा ठीक असतील अशी आशा आहे पत्राचे उत्तर पाठव’ असा मजकूर या पत्रात असून खली फ्लोसी बर्गीज अशी सही आहे.