रे बॅनच्या सहकार्याने फेसबुक स्मार्ट चष्मा आणणार

फोटो साभार उम्मीद

फेसबुक नव्या वर्षात स्मार्ट चष्मा बाजारात आणणार असून त्यासाठी रे बॅन लॅक्सोटीका बरोबर काम सुरु असल्याची घोषणा  फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने केली आहे. फेसबुक कनेक्ट व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये बोलताना मार्कने ही घोषणा केली आहे. यावेळी नेक्स्ट जनरेशन क्वेस्ट २ वायरलेस व्हीआर हेडसेट सादर केले गेले.

झुकेरबर्गच्या म्हणण्यानुसार त्याने रे बॅन टीमसोबत कारखान्याला भेट दिली आणि त्याचवेळी त्यांच्या खास स्मार्ट चष्म्यासाठी उत्तम तंत्रज्ञान ते देऊ शकतात याची खात्री पटली. दीर्घ काळ फेसबुक आणि लॅक्सोटीका यांच्यात हे सहकार्य सुरु राहील असेही त्याने सांगितले. रे बॅन ब्रांड खालीच हे चष्मे येतील पण या स्मार्ट चष्म्यामध्ये एक इंटिग्रेटेड डिस्प्ले नसेल पण व्हॉइस असिस्टंट असू शकेल असे संकेत दिले गेले आहेत. कोणत्या नावाने हा चष्मा बाजारात येईल किंवा त्याची किंमत काय असेल याची माहिती दिली गेलेली नाही.

या संदर्भात ब्लॉग वर दिलेल्या माहितीनुसार २०२१ मध्ये रे बॅन ब्रांडेड फॅशन फॉरवर्ड स्टाईलसह इनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजीचा मेळ घालून स्मार्ट ग्लास रिलीज होणार असे म्हटले गेले आहे. फेसबुक प्रमाणेच गुगल, अॅपल व अन्य बड्या टेक कंपन्या एआर चष्मे बनविण्याबाबत काम करत आहेत.