भारतात या राणीला दिली गेली होती पहिली लस

फोटो साभार बीबीसी न्यूज

करोना लसीवर अनेक देश संशोधन करत आहेत. या पूर्वी साथीच्या रोगांवर लस तयार करून त्या रोगांचे निर्मुलन करण्यात संशोधक यशस्वी झाले आहेत. देवी सारख्या महाभयानक रोगाचे आज निर्मुलन झाले असले तरी सर्वात पहिली लस याच रोगावर तयार केली गेली होती असे इतिहास सांगतो. या लसीचा भारतात प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ही लस एका राणीला सर्वप्रथम दिली गेली होती असे सांगितले जाते.

केम्ब्रिज विद्यापीठातील इतिहासतज्ञ डॉ. चान्सलर यांनी या संदर्भात एका पेंटिंगचा दाखला दिला आहे. या पेंटिंग मध्ये द. भारतातील मैसूरचे राजे कृष्णराव वाडीयार तिसरे हे गादीवर होते. १८०५ साली त्यांनी देवजमनी नावाच्या १२ वर्षाच्या मुलीशी विवाह करून तिला राणी बनविले. हा विवाहच मुळी या राणीला देवीच्या लसीचा डोस देण्यासाठी केला गेला होता. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनी भारतात प्रबळ होती आणि तिच्याच कृपेने वाडीयार ३० वर्षानंतर पुन्हा मैसूरच्या गादीवर येऊ शकले होते. टिपू सुलतानाचा पराभव करून वाडीयार याना गादीवर बसविले गेले होते.

त्या अगोदर सहा वर्षे ब्रिटीश डॉक्टर जेनर एडवर्ड याने देवीची लस तयार केली होती. त्या काळी भारतात देवीची साथ म्हणजे देवाचा कोप मनाली जात होती आणि या स्थितीत अनेक जणांचा प्राण जात असे. भारतात देवीचे लसीकरण करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने सत्ता, ताकद व राजकारणाचा वापर केला होता. राणीलाच पहिली लस दिली गेली की तिचा प्रभाव पडून अन्य जनता लस घेईल असा त्यामागे उद्देश होता. या संदर्भात ज्या पेंटिंगचा उल्लेख येतो त्यात या राणीचा एक हात पदर बाजूला केलेल्या स्थितीत आहे कारण त्या दंडावर तिला कुठे लस दिली गेली ते दिसावे असा उद्देश होता. या पेंटिंग मध्ये तीन महिला आहेत. पैकी एक देवजमनी ही छोटी राणी, दुसरी वाडीयार याची पहिली पत्नी आणि मध्ये त्यांची आजेसासू आहे. या आजेसासुचा नवरा देवीने गेला होता त्यामुळे देवीची लस राणीला दिली जावी यासाठी तिचा आग्रह होता असेही सांगितले जाते.