‘NDA म्हणजे No Data Available’, आकडे न देणाऱ्या सरकारला शशी थरूर यांचा टोला


संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने अनेक मुद्यांवर आपल्याकडे आकडेवारी नसल्याचे सांगितले. मागील आठवड्यात प्रवासी कामगारांच्या मृत्यूच्या आकडेवारीनंतर आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत देखील सरकारने तेच उत्तर दिले. सरकारकडे आकडेवारी उपलब्ध नसल्याने विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. आता काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एक कार्टुन शेअर करत व्यंगात्मक पद्धतीने सरकारवर निशाणा साधला आहे.

थरूर यांनी एनडीएचा फुल फॉर्म ‘No Data Available’ सांगणारे कार्टुन शेअर करत लिहिले की, प्रवासी कामगारांबाबत कोणताही डेटा नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत कोणताही डेटा नाही. वित्तीय आकडेवारी चुकीची, कोव्हिडमुळे झालेल्या मृत्यूचा डेटा बनावट, जीडीपी ग्रोथबाबतही स्पष्ट डेटा नाही. या सरकारने एनडीए या टर्मची पुर्ण परिभाषाच बदलून टाकली आहे.

दरम्यान, सरकारने संसदेत विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देताना आपल्याकडे आकडेवारी  उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. सरकारला लॉकडाऊनमध्ये मृत्यू झालेल्या प्रवासी कामगारांबाबत प्रश्न विचारला असता, सरकारने याची कोणतीही आकडेवारी नाही, त्यामुळे भरपाई देण्याचा प्रश्नच नसल्याचे म्हटले होते. याशिवाय शेतकरी आत्महत्या, कोरोना योद्ध्यांचा मृत्यू आणि देशातील एकूण प्लाझ्मा बँकबाबत देखील आकडेवारी नसल्याचे सरकारने म्हटले होते.