पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्च 2015 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान 58 देशांचा दौरा केला असून, या दौऱ्यासाठी एकूण 517.82 कोटी रुपये खर्च आला. याबाबतची माहिती संसदेत देण्यात आली. राज्यसभेत एका प्रश्नाचे लिखित उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या या भेटींमुळे द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांबाबतच्या भारताच्या दृष्टिकोनाबद्दल इतर देशांची समज वाढली आणि संबंध दृढ झाले.
4 वर्षात पंतप्रधान मोदींनी केला 58 देशांचा प्रवास, आला इतके कोटी खर्च
एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी मोदींच्या परदेश दौऱ्याबाबत प्रश्न विचारला होता. याचे उत्तर देताना मंत्री मुरलीधरन यांनी सांगितले की, 2015 पासून पंतप्रधान मोदींनी 58 देशांचा प्रवास केला आहे. या प्रवासावर एकूण 517.82 कोटी रुपये खर्च आला.
परराष्ट्र राज्यमंत्री म्हणाले की, दौऱ्यातील चर्चेमुळे व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, सागरी सहकार्य, अवकाश, संरक्षण सहकार्य आणि लोकसोबतच्या संपर्कामुळे अनेक क्षेत्रात त्यांचे संबंध दृढ झाले आहेत. या दृढ संबंधांनी आर्थिक विकासास प्रोत्साहन देणे आणि आपल्या नागरिकांच्या उन्नतीसाठी भारताच्या राष्ट्रीय विकासाच्या अजेंडाला हातभार लावला आहे.