वय जास्त असल्याने मिळत नव्हती नोकरी, क्षमता सिद्ध करण्यासाठी माजी सीईओने केला गजब कारनामा


तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल, तर वय कधीच अडथळा ठरत नाही असे म्हटले जाते. हेच स्कॉटलँडमधील 60 वर्षीय पॉल मार्क्स यांनी सिद्ध करून दाखवले आहे. लॉकडाऊन दरम्यान मार्क्स यांची नोकरी गेली व वाढत्या वयामुळे त्यांना कोठे नोकरीही मिळत नव्हती. मात्र त्यांनी हार न मानता वयाच्या 60व्या वर्षी देखील ते किती तंदरुस्त आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुशअप करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर त्यांच्याकडे नोकरीची रांगच लागली.

लंकाशायर येथे राहणारे पॉल 5 महिन्यांपुर्वी दुबईच्या क्रियोल ग्रुपचे सीईओ होते. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांची नोकरी गेली. यानंतर त्यांनी नोकरीसाठी भारत, यूएई, ब्रिटन आणि स्पेन सारख्या देशांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. मात्र वयामुळे त्यांना नोकरी मिळाली नाही. मात्र आपण किती फिट आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी चक्क लिंक्डइनवर आपला व्हिडीओ शेअर केला. त्यात ते सूट घालून पुशअप करत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या असंख्य नोकऱ्या आल्या.

मार्क्स म्हणाले की, ते दररोज 50 पुशअप आणि 30 किमी धावतात. वय कधीही क्षमता किंवा उत्पादकतेचे मोजमाप असू शकत नाही आणि 60 वर्षांच्या प्रत्येक व्यक्तीने आपले दिवस वृत्तपत्र वाचणे किंवा टीव्ही पाहण्यात घालवावे हे आवश्यक नाही.

त्यांच्या या व्हिडीओला लाखो लोकांनी बघितले आहे. अनेकांनी त्यांनी नोकरीची ऑफर दिली आहे. मात्र याआधी त्यांना 50 पेक्षा अधिक कंपन्यांनी नोकरीसाठी नाकारले होते.