दररोज 2 रुपये गुंतवून वर्षाला मिळवा 36 हजार, या योजनेत करा नोंदणी


जर तुमची कमाई 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि तुम्ही निवृत्तीनंतरची कोणतेही प्लॅनिंग केले नसेल तर केंद्र सरकारची एक योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते. सरकारच्या पीएम श्रमयोगी मानधन योजना पेंशन योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर महिन्याला 3 हजार किंवा वर्षाला 36 हजार रुपये मिळू शकतात. 18 ते 40 वय असणारी कोणतीही व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकते. आतापर्यंत 45 लाखांपेक्षा अधिक लोक या योजनेशी जोडले गेले आहेत.

समजा, कर्मचारी 18 वर्षांचा असेल तर त्याला 60 वर्षांचे होईपर्यंत महिन्याला 55 रुपये भरावे लागेल. म्हणजेच दरदिवसाला 2 रुपयांपेक्षाही कमी रक्कम भरावी लागेल. वय जास्त असताना या योजनेशी जोडले गेल्यास रक्कम अधिक भरावी लागू शकते. जर व्यक्ती 40 वर्षांची असेल, तर दर महिन्याला 200 रुपये योगदान द्यावे लागेल. जेवढे पैसे खातेधारक भरेल, तेवढेच योगदान सरकारकडून देखील मिळेल.

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. ज्यात रोजंदारीवर काम करणारे मजूर, ड्राइव्हर, इलेक्ट्रिशियन आणि स्वीपर या सारख्या कामगारांचा समावेश आहे. याशिवाय मासिक उत्पन्न 15 हजारांपेक्षा जास्त नसावे.

अशी करा नोंदणी –

  • या योजनेत नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि बचत खाते/जनधन खाते असणे गरजेचे आहे. सोबतच तुमचा मोबाईल नंबर देखील लिंक्ड असणे गरजेचे आहे.
  • योजनेच्या नोंदणीसाठी तुम्हाला सीएससी सेंटरवर जावे लागेल.
  • सीएससी सेंटरवर आधार कार्ड, खात्याची माहिती द्यावी लागेल. पुरावा म्हणून तुम्ही पासबूक, चेक किंवा बँक स्टेटमेंट दाखवू शकता.
  • खाते उघडतानाच नॉमिनीचा उल्लेख करू शकता.
  • नोंदणी केल्यानंतर महिन्याला किती रक्कम भरायची याची माहिती मिळेल.
  • सुरुवातीची रक्कम रोख भरावी लागेल.
  • यानंतर तुमचे खाते उघडेल व तुम्हाला श्रम योगी कार्ड मिळेल.
  • या योजनेची माहिती टोल फ्री नंबर 1800 267 6888 वर घेऊ शकता.