निलंबित खासदारांचे रात्रभर संसदेच्या लॉनमध्ये आंदोलन, उपसभापतींचेही उपोषण


कृषी विधेयकाबाबत रविवारी राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या 8 खासदारांना काल निलंबित करण्यात आले होते. यामध्ये डेरेक ओ’ब्रायन, संजय सिंह, रिपुन बोरा, नजीर हुसैन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव आणि डोला सेन यांचा समावेश आहे. निलंबनाच्या कारवाई विरोधात या खासदारांनी काल रात्रभर संसद परिसरात गांधीजींच्या प्रतिमेजवळ प्रदर्शन केले.

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश प्रदर्शन करणाऱ्या खासदारांना सकाळी चहा देण्यासाठी देखील गेले. मात्र खासदारांनी चहा घेण्यास नकार दिला. निलंबनानंतर कालपासून हे खासदार संसदेच्या परिसरात आंदोलन करत आहेत. त्यांच्या हातात ‘हम किसानों के लिए लड़ेंगे’ आणि ‘संसद की हत्या’ अशा आशयाचे बॅनर देखील होते.

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले की, आज सकाळी उपसभापती आले होते. आम्ही त्यांना म्हणालो की त्या दिवशी नियम-कायदे न पाळता शेतकरी विरोधी विधेयक पास करण्यात आले. भाजपकडे बहुमत नव्हते. आम्ही मतदान करण्याची मागणी करतो.

दुसरीकडे, राज्यसभेत घडलेल्या घडामोडींमुळे उपसाभपती हरिवंश यांनी एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना माहिती दिली आहे.