सोशल मिडियावर व्हायरल झाला भारत पाकिस्तान पिझ्झा

जगभरात २१ सप्टेंबर हा जागतिक शांतता दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर व्हिएतनाम येथील ‘पिझ्झा फोर’ रेस्टॉरंटने बनविलेले तीन पिझ्झा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जगभरात सुख शांती नांदावी या उद्देशाने या रेस्टॉरंटमध्ये भारत पाकिस्तान, युएसए- चीन आणि इस्रायल- पॅलेस्टाइन असे तीन विशेष पिझ्झा बनविले गेले. इन्स्टाग्रामवर या पिझाचे फोटो व्हायरल झाले.

‘पिझ्झा फॉर पी’ म्हणजे शांतीसाठी पिझ्झा या नावाने हे फोटो झळकले असून त्याखाली विश्वशांती दिनाच्या निमित्ताने सुख शांतीचा अनुभव घेऊ असे लिहिले गेले आहे. व्हिएतनाममधील हे जापनीज इटालियन पिझ्झा रेस्टॉरंट असून त्यांनी हे तीन नवे पिझ्झा सादर केले. त्यात त्यांनी त्या त्या देशात प्रचलित असलेले पदार्थ वापरले आणि तीच नावे पिझ्झाला दिली.

भारत पाकिस्तान पिझ्झाचे नामकरण दिल्ली पालक पनीर कराची चपली कबाब असे केले गेले आहे तर तेल अवीव हम्मास रमला गुरकहन असे इस्रायल- पॅलेस्टाइन पिझ्झाचे नामकरण केले आहे. युएसए चीन पिझ्झाचे नामकरण शांघाय चिली श्रीम्प, न्युयॉर्क बफेलो चिकन असे केले गेले आहे.

संयुक्त राष्ट्राने १९८१ मध्ये सप्टेंबरचा तिसरा मंगळवार जागतिक शांतता दिन म्हणून पाळण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार १९८२ ते २००१ पर्यंत सप्टेंबरचा तिसरा मंगळवार जागतिक शांतता दिन म्हणून पाळला गेला मात्र २००२ पासून २१ सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.