पत्नीचा विरह सहन न झाल्याने पतीने पाठविले ८ किलोचे प्रेमपत्र

 

फोटो साभार न्यूज १८

एक जमाना असा होता की प्रेमभावना व्यक्त करायची तर गोड गोड प्रेमपत्र लिहिण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आजकाल डिजिटल मिडिया म्हणजे व्हॉटस अप, फेसबुक, इमोजी अशी प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक साधने सहज आणि तत्काळ उपलब्ध आहेत. मात्र अशी काही वेगवान साधने असू शकतील अशी कल्पनाही ज्या काळी शक्य नव्हती त्या काळात प्रेमपत्र हाच एक मार्ग होता. आज अनेकांच्या गाठीला प्रेमपत्रांच्या आठवणी असतील. प्रेमपत्रांचे हजारो किस्से, गोष्टी, कहाण्या आजही ज्येष्ठ नागरिक ऐकवतील.

याच काळातील एका प्रेमवेड्याने सतत माहेरी जाणाऱ्या बायकोच्या आठवणी मुळे व्याकुळ होऊन तिला आठ हजार पानी प्रेमपत्र लिहिले होते. त्यांचे नाव जीवनसिंग बिश्त. हे मेरठचे राहणारे असून शहरात त्यांची ओळख रेकॉर्डसिंग अशी आहे. ते आयकर विभागात नोकरी करून निवृत्त झाले आहेत. २० वर्षापूर्वी सतत दोन महिने या पत्राचे लिखाण केले गेले तेव्हा त्या कागदांचे वजन झाले आठ किलो. हे पत्र पाठविण्यासाठी त्या काळात या माणसाला ७०० रुपये खर्च आला होता. हे पत्र त्यांनी आजही सांभाळून ठेवले आहे.

जीवनसिंग सांगतात, त्यांची पत्नी कमला उत्तराखंड येथील अल्मोडा येथे राहणारी होती आणि लग्नानंतर सतत माहेरी जात असे. जीवनसिंग यांना तिची सतत आठवण येत असे. त्याकाळी फोन फार क्वचित कुणाकडे असे. यामुळे जीवनसिंग पत्रे लिहीत असत, एकदा रागावून पत्नी माहेरी गेली आणि बरेच दिवस आली नाही तेव्हा जीवनसिंग यांनी १९९९ मध्ये भलेमोठे पत्र लिहायला घेतले. कामावरून परतल्यावर ते रात्री जागून पत्र लिहीत. या पत्रात काय नव्हते? प्रेमाची भाषा होतीच पण दररोज काय काय घडतेय याचीही माहिती होती. कारगील युद्ध सुरु झाले याचीही माहिती होती तसेच या युद्धात शहीद झालेल्या ५२५ जवानांची शौर्यगाथा सुद्धा होती.

ओरिसा वादळात हजारोनी मृत्यू झाल्याची माहिती लिहून झाल्यावर जीवनसिंग यांनी हे पत्र पोस्ट करायचे ठरविले पण तेवढ्यात कंधार विमान अपहरण प्रकरण झाले मग त्याचीही माहिती त्यांनी पत्रात लिहिली. शेवटी आठ किलो वजनाचे हे पत्र त्यांनी ७०० रुपये भरून पोस्ट केले. पत्नीला ते मिळाले तेव्हा सुरवातीला ती नाराज झाली पण जसे वाचत गेली तशी भावूक झाली असे जीवनसिंग सांगतात.

जीवनसिंग यांनी दोन फुट लांबीचे आणि दोन किलो वजनाचे वांगे बागेत पिकवून लिम्का रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविले आहे. त्यांचे प्रेमपत्र सुद्धा जगातील सर्वात मोठे प्रेमपत्र असल्याचे समजते.