ग्रेटर लंडन मध्ये भव्य जगन्नाथ मंदिर उभारणार

 

फोटो साभार ओडिसा न्यूज

विश्वविख्यात पुरीचे जगन्नाथ मंदिर आता ग्रेटर लंडन मध्येही बांधले जाणार असून त्यासाठी ओरिसा सोसायटी ऑफ युके ने पुढाकार घेतला आहे. पुरी येथील मंदिराप्रमाणेच हे मंदिर बांधले जाणार आहे. जगन्नाथ पुरीचे मंदिर हे सनातन परंपरेतील चार धाम मधील एक धाम आहे. शंकराचार्यानी जी चार पीठे स्थापन केली त्यातील गोवर्धन मठ हे पुरी मध्ये आहे.

ग्रेटर लंडन मध्ये या मंदिरासाठी १० ते १२ एकर जमीन शोधली जात असून ४० कोटी रुपये खर्चून हे मंदिर उभारले जाणार आहे. दानाच्या रकमेतून हे काम केले जाणार असून सुरवातीचा खर्च ब्रिटन मध्ये राहत असलेल्या ओडीसी लोकांकडून केला जाणार आहे. या जागेत मंदिर असेल आणि ओरिसाची संस्कृती दर्शविणाऱ्या अन्य बाबी असतील. पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्याबरोबर व्हिडीओ माध्यमातून चर्चा केली गेल्याचे आणि मार्गदर्शन घेतले गेल्याचे सांगितले जात आहे. २०२४ पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

पाश्चिमात्य देशात सर्वाधिक हिंदू मंदिरे ब्रिटन येथेच आहेत. येथे २१० मंदिरे असून ग्रेटर लंडन मध्ये ३५ मंदिरे आहेत. त्यात इस्कोन स्वामी नारायण, रामकृष्ण मिशन यांचाही समावेश आहे. जगभरात जगन्नाथाची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. बांग्लादेशात १६ व्या शतकातील जगन्नाथ मंदिर असून पाकिस्तानच्या सियालकोट येथे २००७ साली एक मंदिर बांधले गेले आहे. या शिवाय ऑस्ट्रेलिया, लंडन, इटली, सॅनफ्रान्सिस्को, शिकागो, मास्को, मॉरिशस येथेही जगन्नाथ मंदिरे आहेत आणि तेथेही रथयात्रा काढली जाते.

Loading RSS Feed