6 महिन्यांनंतर ताजमहाल पुन्हा पर्यटकांसाठी खुला


आग्रा येथील ताजमहाल आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. पर्यटकांना प्रवेश करताना मास्क, सोशल डिस्टेंसिंगच्या अन्य नियमांचे पालन करावे लागणार आहे.

कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण पाहता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 17 मार्चपासून ताजमहाल बंद ठेवले होते. आता आजपासून (21 सप्टेंबर) ताजमहाल पुन्हा पर्यटकांसाठी उघडण्यात आला आहे. जवळपास 188 दिवसांनी पर्यटकांना ताजमहाल पाहता येणार आहे.

येथे येणाऱ्या पर्यटकांना संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून नवीन व्यवस्था बनविण्यात आली आहे. या व्यवस्थेंतर्गत ताजमहालमध्ये एकादिवसात केवळ 5 हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल. यासाठी दोन शिफ्ट करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या शिफ्टमध्ये 2500 आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये 2500 जणांना ताजमहाल पाहता येईल.

ताजमहाल खुला करण्यापुर्वी संपुर्ण तयारी करत आहे. तिकिट विंडो बंद असेल, ऑनलाईन तिकिट खरेदी केल्यावरच प्रवेश मिळेल. पार्किंगसह सर्व शुल्क ऑनलाईनच भरावे लागेल.