तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे अनेकांना कोरोनाची लागण – केंद्र सरकार


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेकदा आदेश जारी केल्यानंतरही मार्च महिन्यात दिल्लीत तबलिगी जमातने कार्यक्रमाचे आयोजन केले. यामुळे  अनेक लोकांना व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती, केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.

तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामुळे दिल्ली व इतर राज्यात कोरोना पसरला का ? या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले की,  दिल्ली पोलिसांच्या रिपोर्टनुसार कोव्हिड-19 च्या उद्रेकानंतर विविध अधिकाऱ्यांकडून अनेकदा गाईडलाईन्स आणि आदेश जारी करण्यात आले होते. असे असले तरी बंद ठिकाणी दीर्घकाळासाठी मोठी गर्दी जमली होती. यावेळी कोणत्याही सोशल डिस्टेंसिंगचे पालन झाले नाही व मास्क, सॅनिटायझर देखील वापरले नाही. त्यामुळे अनेकांना व्हायरसची लागण झाली.

मार्चमध्ये दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरातील एका मशिदीत तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने शेकडो परदेशी आणि स्थानिक लोकांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्रालयाने सांगितले की, 29 मार्चला जवळपास 2361 तबलिगी जमातीच्या लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले. 233 लोकांना दिल्ली पोलिसांनी अटक देखील केले आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी 36 देशांमधील 956 परदेशी नागरिकांविरोधात 59 चार्जशीट दाखल केल्या आहेत. सरकारने त्यांचा व्हिसा देखील रद्द केला असून, त्यांना ब्लॅकलिस्ट केले आहे.