… तर मराठा समाजाला जे महाराष्ट्रापुरते मिळणारे आरक्षण आहे तेही मिळणार नाही – प्रकाश आंबेडकर


सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा नेत्यांनी थोडा संयम बाळगावा, मराठा आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करु नये, असे म्हटले आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी जे काही समाज माध्यमांवर वाचतोय त्याचा अर्थ असा आहे की की, मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, मात्र आमच्या ताटातले नको, अशीच ओबीसी समाजाची मागणी आहे. त्यामुळे मराठा नेत्यांनी हा विषय अधिक गुंतागुंतीचा करु नये. ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नये.

आंबेडकर म्हणाले की, मराठा समाज हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जरी मराठा समाज 16 टक्के असला तरी देशात तो फक्त 2 टक्के आहे. त्यामुळे देशभरातील ओबीसी जर एकत्र आले तर मराठा समाजाला जे महाराष्ट्रापुरते मिळणार आरक्षण आहे तेही मिळणार नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने एक स्टे ऑर्डर दिली म्हणून घाबरून न जाता,  अंतिम सुनावणीला आल्यास मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय कायम ठेवेल.

न्यायालयात निकाल मराठ्यांच्याच बाजूने लागेल. हा विषय गुंतागुंतीचा करू नका. त्यामुळे सुरळीत चाललेलं आंदोलन, मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करण्याच्या परिस्थितीत आहे. त्याला खो घालू नये, अशीही विनंतीही त्यांनी केली.