मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका


मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगित हटविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत अंतरिम स्थगिती हटविण्यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तुर्तास स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारवर जोरदार टीका होत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला संयम बाळगत, आरक्षण टिकवण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन दिले होते. सरकारकडून वेगवेगळ्या कायदेशीर पर्यायांवर विचार सुरू होता. आता अखेर सरकारने आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

9 सप्टेंबरला आपल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत, हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. न्यायालयाने अंतरिम आदेशात 2020-21 या वर्षात मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणता आरक्षण मिळणार नाही असे म्हटले होते. तसेच, यापुर्वी आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांना कोणतीही समस्या निर्माण होणार नाही असे म्हटले होते.