मुंबईत एनसीबीचे ऑफिस असलेल्या इमारतीत आग


मुंबईत एनसीबीचे ऑफिस असलेल्या इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. रिया च्रकवर्ती आणि बॉलिवूडच्या ड्रग्स कनेक्शनचा तपास करत असलेल्या एनसीबीचे ऑफिस याच इमारतीत आहे. याबाबतची माहिती नवभारत टाईम्सने दिली आहे.

एनसीबीचे ऑफिस बालार्ड पिअर येथील एक्सचेंज बिल्डिंगमध्ये आहे. याआगीत कोणत्याही महत्त्वपुर्ण कागदपत्रांचे नुकसान झाले नसल्याचे  अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्स, रिया चक्रवर्ती आणि बॉलिवूड कनेक्शन संबंधित कागदपत्र याच एनसीबीच्या ऑफिसमध्ये आहेत.

अचानक आग लागल्याने बिल्डिंगमध्ये गोंधळ उडाला. त्वरित अग्निशामक दलाला याबाबतची सुचना देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. याच बिल्डिंगमध्ये एनसीबीचे ऑफिस आहे, मात्र ते तिसऱ्या मजल्यावर आहे. एनसीबीचे ऑफिस पुर्णपणे सुरक्षित आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, या घटनेत कोणती व्यक्ती जखमी झालेली नाही.