भारताने मालदीवला केली आर्थिक मदत, चीनची चिंता वाढणार


कोरोना व्हायरस महामारीमुळे अनेक देशातील अर्थव्यवस्था कोलमंडली आहे. भारताच्या शेजारील देश मालदीवला देखील मोठा फटका बसला आहे. आता मालदीवच्या मदतीसाठी भारत पुढे आला असून, सरकारने 25 कोटी डॉलर्सची आर्थिक मदत केली आहे. भारताचे हे पाऊल चीनशी देखील जोडले जात आहे. चीन मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवत आहे. येथील परदेशी कर्जातील जवळपास 70 टक्के चीनचे कर्ज आहे. मालदीव हिंद महासागरातील महत्त्वाच्या ठिकाणी आहे, त्यामुळे मालदीवमधील चीनचे वर्चस्व कमी करणे भारतासाठी आवश्यक आहे.

भारताच्या आर्थिक मदतीसाठी आभार मानत मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनी ट्विट केले की, जेव्हा भारताला एका मित्राच्या मदतीची गरज असते, त्यावेळी भारत समोर येतो. पंतप्रधान मोदी, सरकार आणि भारताच्या लोकांचे मनापासून आभार. त्यांनी 25 कोटी डॉलर्सची मदत करत शेजारी असण्याची भावना आणि उदारता दाखवली.

मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी देखील मदतीसाठी भारताचे आभार मानले. मालदीवच्या अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे कोरोना संकटात अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला.

भारताकडून आर्थिक मदतीची घोषणा मागील आठवड्यात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्रमंत्री शाहिद यांच्यामध्ये झालेल्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये करण्यात आली होती.  हे कर्ज परत करण्यासाठी मालदीवकडे 10 वर्षांचा कालावधी आहे. भारत मालदीवच्या मदतीसाठी डॉक्टर आणि तज्ञांची टीम देखील पाठवणार आहे. याशिवाय तेथील 500 रुग्ण भारतात उपचारासाठी येणार आहेत.