विरोधी पक्ष घेणार राष्ट्रपतींची भेट, कृषी विधेयकांवर सही न करण्याची करणार विनंती


कृषी विधेयकाबाबत संसदेपासून ते रस्त्यापर्यंत संघर्ष सुरू आहे. या विधेयकावरून विरोधी पक्षांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. राष्ट्रपतींनी दोन्ही विधेयकांवर स्वाक्षरी करू नये व परत राज्यसभेत पाठवावे, अशी विनंती विरोधी पक्षांकडून केली जाणार आहे. याशिवाय राज्यसभेत काय घडले याची संपुर्ण माहिती राष्ट्रपतींना दिली जाईल.

राज्यसभेत काल गोंधळातच शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार ही विधेयके आवाजी मतदानाद्वारे मंजूरी झाली. या दरम्यान विरोधी पक्षातील खासदारांनी गोंधळ घातला. यानंतर आज 8 खासदारांना निलिंबत करण्यात आले.

12 विरोधी पक्ष राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर खासदारांना निलंबित करण्यात आल्याचा देखील मुद्दा मांडणार आहेत. याशिवाय उद्या पुन्हा एकदा संसदेत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. अनेक विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेबाहेर विधेयकाविरोधात आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी या विधेयकांविरोधात 25 सप्टेंबरला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.