ट्रम्प यांच्या नावाने आले विषारी पार्सल

फोटो साभार पोलीटीको

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकांचा प्रचार जोरात सुरु असताना पोलिसांना ट्रम्प यांच्या नावावर आलेले विषारी पार्सल मिळाले असून रीसीन या अतिजहाल विषाचा वापर केला गेला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अधिक तपासणी सुरु आहे. हे पार्सल कॅनडा येथून आल्याचे आणि स्थानिक पोस्टातून पाठविले गेल्याचे उघडकीस आले आहे. अमेरिकन मिडीया रिपोर्ट नुसार शनिवारी हे पार्सल सापडले होते.

अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाउस येथे येणारे प्रत्येक पत्र, पार्सल काळजीपूर्वक तपासून मगच राष्ट्रपतींकडे पाठविले जाते. एफबीआय व सिक्रेट सर्व्हिस या संदर्भात तपास करत आहे. रीसीन हे अतिजहाल विष असून यापूर्वी त्याचा वापर दहशतवादी हल्यात केला गेला आहे. ते पावडर, द्रव आणि पेलेट स्वरुपात मिळते. ते पोटात गेले तर उलट्या होतात, पोटात रक्तस्त्राव होऊन मूत्रपिंडे आणि यकृत निकामी होतात आणि रक्ताभिसरणात अडथळा येऊन माणसाचा मृत्यू होतो.

एफबीआय ने या प्रकरणी एका महिलेवर संशय व्यक्त केला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री जिम मॉरिस यांच्या नावाने याच प्रकारे विषारी लिफाफे पाठविले गेले होते. त्यात नाविक दलाच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर अजूनही केस सुरु आहे. २०१३ मध्ये मिसिसिपी येथील एका व्यक्तीने तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा आणि रिपब्लिकनच्या एका सिनेटरला रीसीन असलेली पार्सले पाठविली गेली होती. त्यात दोषी ठरलेल्या एका महिलेला १८ वर्षाची शिक्षा सुनावली गेली आहे.