उणे ८० डिग्री तपमानात साठवली जाणार कोविड १९ लस

जगात सध्या करोनाच्या विविध प्रकारच्या १७० लसींवर संशोधन सुरु आहे आणि त्यातील ३० लसी क्लिनिकल ट्रायल मध्ये आहेत. मात्र या लसी साठविण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार असून त्यासाठी उणे ८० डिग्री तापमान असेल तरच ही लस सुरक्षित राहू शकणार असल्याचे समजते. ही लस यशस्वीपणे साठविणे आणि गरजेनुसार जनतेपर्यंत पोहोचविणे हे सुद्धा एक आव्हान ठरणार आहे. कारण उणे ८० डिग्री तपमान फक्त दक्षिण धृवावरच आहे. यावर अमेरिकन लॉजिस्टीक कंपनी युपीएसने नेदरलंड मध्ये फुटबॉल मैदानाच्या आकाराची स्टोरेज सुविधा तयार केली आहे.

या स्टोरेज मध्ये २ मीटर उंचीचे डझनावारी फ्रीज असून त्यात उणे ८० डिग्री तपमान राखले गेले आहे. कोविड १९ लस येथेच साठवून मग वितरित केली जाणार आहे. लस साठविण्यासाठी उणे ८० तपमानात टिकू शकतील अश्या विशेष काचेच्या बाटल्या तयार केल्या गेल्या आहेत. लस वितरित करताना विमाने, ट्रक, गोदामे येथेही डीप फ्रिजर मधून नेली जाईल.

युपीएस हेल्थकेअरचे प्रमुख हेसेन या संदर्भात माहिती देताना म्हणाले, जर्मन अमेरिकन एअर कार्गो जवळच अशी केंद्रे उभारली गेली असून त्यात ६०० फ्रीझर आहेत. एका फ्रीझर मध्ये ४८ हजार डोस ठेवता येणार आहेत. इतक्या थंड तापमानात नुसते चालणे शक्य नाही हे लक्षात घेऊन येथील कर्मचाऱ्यांना पीपीई किट सह आवश्यक ते सर्व सामान दिले जाणार आहे. लस मागणीनुसार इन्सुलेटेड डब्यातून पाठविली जाईल. योग्य तापमानात ९६ तास ही लस चांगल्या अवस्थेत राहू शकेल असेही सांगितले जात आहे.