एनटीआरओ- सरकारचा तिसरा डोळा

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑरगनायझेशन म्हणजेच एनटीआरओच्या अध्यक्षपदी रॉचे माजी प्रमुख अनिल धस्माना यांची निवड झाल्यावर पुन्हा एकदा ही संस्था चर्चेत आली आहे. उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीर मध्ये केल्या गेलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो म्हणून अनिल धस्माना यांची ओळख आहे. ते पाकिस्तान विषयातील एक्स्पर्ट मानले जातात.  एनटीआरओ ला सरकारचा तिसरा डोळा म्हटले जाते. धस्माना यांची नियुक्ती या संस्थेचे प्रमुख म्हणून केली गेल्याने काही संकेत दिले गेल्याचे मानले जात आहे.

एनटीआरओ म्हणजे नक्की काय याची माहिती येथे करून घेणे आवश्यक आहे. देशाच्या सुरक्षेला हानिकारक अशी गुप्त माहिती मिळविणे हे तिचे मुख्य काम असून ही संस्था सुद्धा रॉ आणि आयबी प्रमाणेच काम करत असली तरी या दोन्ही गुप्तचर यंत्रणांपेक्षा वेगळी आहे. विशेष म्हणजे या संस्थेचा आराखडा माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांनी तयार केला होता.

कारगील युद्धाच्या वेळी पाक घुसखोरी होणे हे गुप्तचर संस्थांचे अपयश मानले गेले होते. त्यावेळी नेमल्या गेलेल्या सुब्रमण्यम यांच्या कमिटीने असाच अहवाल दिला होता. त्यावेळी अब्दुल कलाम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. तेव्हा त्यांनीच नॅशनल टेक्निकल फॅसिलीटी ऑर्गनायझेशनचा आराखडा तयार केला होता. त्याचेच नामकरण २००४ मध्ये एनटीआरओ असे केले गेले. ही संस्था देशाच्या सुरक्षेला बाधक माहिती गोळा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करते. बालाकोट हल्ल्यात नक्की किती अतिरेकी मारले गेले याचा आकडा याच संस्थेने दिला होता आणि ३०० हून अधिक अतिरेकी मारले गेल्याची माहिती दिली होती. त्यावेळी उपग्रहाच्या सहाय्याने त्या जागेचे फोटो काढून माहिती मिळविली गेली होती.

ही संस्था नजर ठेवण्यासाठी उपग्रहाची मदत घेते तसेच मोबाईल मॉनिटर करणे, महत्वाच्या संघटना, इमारतींवर पाळत ठेवणे, ड्रोन पाहणी करणे या बरोबर समुद्री सुरक्षेवर सुद्धा लक्ष ठेवते. संस्थेच्या मदतीला त्यासाठी दोन उपग्रह रडार आहेत त्याचबरोबर युध्द संबंधी हार्डवेअर, सॉफ्टवेअर सुरक्षेचेही रक्षण केले जाते. माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करणे हे मुख्य काम येथे होते. ही संस्था पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या अधिपत्याखाली काम करते. रॉ आणि आयबी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीखाली येतात. आयबी ही देशातील सर्वात जुनी म्हणजे ब्रिटीश काळापासूनची गुप्तचर संघटना आहे.१९६२ आणि ६५ च्या युद्धात अपयश आल्यावर रॉ ची स्थापना केली गेली होती.