आता अमेरिकन कंपनीकडे येणार Tik Tokची मालकी


वॉशिंग्टन : चीनची व्हिडियो शेअरिंग अॅप कंपनी बाइटडांसला अमेरिकेची सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकल विकत घेणार असून या कराराला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजूरी दिली आहे. त्याचबरोबर या कराराचा वॉलमार्टही एक भाग असेल अशी माहितीही ट्रम्प यांनी दिली. या कंपनीचे ऑफिस टेक्सासमध्ये असणार असून टीक-टॉकची मालकी त्यामुळे अमेरिकेकडे येणार आहे.

अमेरिकन कोर्टातही हे प्रकरण गेले होते. अमेरिका आणि चीनमध्ये संबंध बिघडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्धाला सुरूवात झाली होती. अमेरिका चिनी मालांवर सूट देते मात्र चीन अमेरिकन कंपन्यांना सवलती देत नाही असा अमेरिकेचा आरोप आहे. चीनने WeChat आणि Tik Tok वर बंदी घालण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. या कंपन्यांची मालकी अमेरिकन कंपन्याकडे आली नाही तर त्यावर बंदी घातली जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. या अॅप्समुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. या कंपन्या वापरकर्त्यांचा डेटा चोरतात असा त्यांच्यावर आरोप असल्यामुळेच भारतातही त्यावर बंदी घालण्यात आली आहे. जगभर या अॅपचा वापर केला जातो आणि त्या माध्यमातून या कंपन्यांची हजारो कोटींची कमाई होत असते.