…म्हणून मी आयपीएलमधून माघार घेतली – मयंती लँगर


मुंबई – आयपीएलमधून माघार घेण्याचे खरे कारण आता आयपीएलची स्टार समालोचक मयंती लँगरने सांगितले आहे. सहा आठवड्या आधी मयंती आणि स्टुअर्ट बिन्नी या दाम्पत्याला मुलगा झाला असल्यामुळेच यंदाच्या आयपीएलमध्ये मयंती दिसणार नाही. शनिवारी ट्विटरवर एक पोस्ट करून मयंतीने याबाबतची माहिती दिली. यंदा आयपीएलमध्ये मयंती लँगर दिसणार नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. त्याची पुष्टी देखील करण्यात आली होती. पण आता मयंतीनेच ट्विट करून यामागील खरे कारण काय, याची माहिती देखील दिली आहे.


आपल्या पोस्टमध्ये मंयतीने म्हटले आहे की, जेव्हा मला जास्त गरज होती. तेव्हा स्टार स्पोर्ट्सने मला माझ्या कुटुंबाप्रमाणे साथ दिली. माझ्यासाठी त्यांनी खुप बदल केले होते, असे म्हणत मयंतीने स्टार स्पोर्ट्सचे आभार देखील मानले आहेत. या आधी देखील शुक्रवारी मंयती हिने एक पोस्ट करत आपण आयपीएलचा भाग नसणार, यामध्ये कोणतेही वादग्रस्त कारण नसल्याचे स्पष्ट केले होते. तिने तिचा पती स्टुअर्ट बिन्नी आणि मुलगा यांच्यासोबतचा एक फोटो देखील ट्विटरवर पोस्ट केला आहे.