संजय मांजरेकरने अंबाती रायुडू, पीयूष चावलाचा केला ‘Low Profile’ क्रिकेटपटू असा उल्लेख


मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील काल खेळवल्या गेलेल्या आयपीएल हंगामातील पहिला सामना एकतर्फी झाला. अखेरच्या 6 षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवून धावगतीवर लगाम लावली. त्यानंतर अंबाती रायुडू आणि फाफ डू प्लेसिस यांनी शतकी भागीदारी करून चेन्नईला विजय मिळवून दिला. पीयूष चावलाने रोहित शर्माला बाद करून मुंबईला मोठा धक्का दिला. चेन्नईच्या विजयात मोलाचा हातभार लावणाऱ्या अंबाती रायुडू आणि चावला यांना समालोचक आणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर याने Pretty Low Profile Cricketer असे संबोधल्यानंतर नेटिझन्सनी त्याला चांगलेच फैलावर घेतले.


तत्पूर्वी देखील 2019च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान त्याने रवींद्र जडेजावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याने हर्षा भोगलेवरही टीका केली होती. आता आयपीएलच्या पहिल्या सामन्यानंतर त्याने केलेले ट्विट व्हायरल झाले आहे. त्याने ट्विट केले की, पीयूष चावला आणि अंबाती रायुडू या दोन Pretty Low profile Cricketersला चांगली कामगिरी करताना पाहून आनंद झाला. 5 व्या व 16व्या षटकात चावलाने उत्तम गोलंदाजी केली. रायुडूनं आयपीएलमधील सर्वोत्तम खेळीपैकी एक काल केली.