निवडणूक आयोगाची CBDTला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासण्याची विनंती


मुंबई – सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) यांना निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादीच्या महिला खासदार सुप्रिया सुळे यांची निवडणूक प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करण्याची विनंती केली आहे. प्रतिज्ञापत्रात या तिघांनी खोटी माहिती दिल्याची तक्रार एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे केली असून त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले असल्याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या मालमत्ता आणि कर्जाची पडताळणी करा, अशी विचारणा CBDTकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात महिनाभरापूर्वी निवडणूक आयोगाकडे तक्रार आली होती. याबाबत एक स्मरणपत्रही पाठविण्यात आल्याचे आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने जून महिन्यांत खोट्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर याबाबत घडामोडी सुरु झाल्या. १६ जून रोजी आयोगाने घोषणा केली होती की, प्रतिज्ञापत्रांमध्ये ज्या उमेदवारांविरोधात चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारी येतील त्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली जाईल.

दरम्यान, एखाद्या उमेदवाराविरोधात जर तक्रारदारांना वाटत असेल की खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी मजबूत खटला तयार होत असेल तर त्यांनी लोकप्रतिनिधी कायदा १२५ अ नुसार थेट कोर्टात जाण्यासाठी निवडणूक जागल्या प्रोत्साहित करीत आहेत. उमेदवाराने तपासणीत आपल्या प्रतिज्ञापत्रात खोटे बोलल्याचे आढळल्यास, आम्ही आमच्या फिल्ड ऑफिसरला उमेदवाराविरूद्ध तक्रार करण्यास सांगायला मागेपुढे पाहणार नाही. आम्ही संबंधित राजकीय पक्षांना किंवा विधानसभा किंवा सभागृहाच्या अध्यक्षांना (जिथून उमेदवार निवडला गेला होता) कळवू शकतो की त्याने किंवा तिने योग्य माहिती दाखल केली नसल्याचे निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी सांगितले होते.