धोनीने लोकप्रियतेच्या बाबतीत सचिन-कोहलीला देखील मागे टाकले – सुनील गावसकर


नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी तब्बल ४३७ दिवसांनी मैदानात उतरला. शनिवारपासून युएईत आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात झाली. चेन्नई सुपरकिंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ५ गडी राखून मात केली. काल संपूर्ण सामन्यात सोशल मीडियावर धोनीची चर्चा होती. धोनी वर्षभरानंतर मैदानावर उतरत असल्यामुळे चाहते उत्साहात होते. याच दरम्यान धोनीचे कौतुक करताना त्याने लोकप्रियतेच्या बाबतीत सचिन आणि कोहलीला मागे टाकले असल्याचे भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि आयपीएलमध्ये समालोचन करत असलेल्या सुनील गावसकर यांनी म्हटले आहे.

धोनी ज्यावेळी मैदानावर येतो, त्यावेळी एक वेगळी उर्जा निर्माण होते. प्रेक्षक मैदानात असो की घरात टिव्हीसमोर…सर्वजण धोनीची वाट पाहत असतात. मला माहिती आहे माझ्या मताशी सचिन आणि विराट कोहलीचे चाहते समहत नसतील. तुम्हाला मुंबई आणि कोलकात्यात सचिनचे चाहते सर्वाधिक मिळतील. तर विराटची दिल्ली आणि बंगळुरुत क्रेझ आहे. परंतू धोनीवर संपूर्ण देशातील चाहते प्रेम करतात. धोनीने लोकप्रियतेच्या बाबतीत सचिन आणि विराटला मागे टाकले, असे गावस्कर सामना सुरु होण्याआधी बोलत होते.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबईने विजयासाठी दिलेल्या १६३ धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून फलंदाजी करण्यासाठी धोनी मैदानात येईल अशी अनेकांना आशा होती. परंतू धोनीने येथेही आपले धक्कातंत्र आजमावत जाडेजा आणि सॅम करनला आपल्या पुढे संधी देत नंतर येणे पसंत केले. करन माघारी परतल्यानंतर धोनी मैदानात खेळण्यासाठी आला…परंतू त्याने एकही धाव न घेता विजयी फटका मारण्याची संधी डु प्लेसिसला दिली.