सुधीर मुनगंटीवारांना कोरोनाची लागण


चंद्रपूर : राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना देखील कोरोनाची लागण झाली असून चंद्रपुरातील त्यांच्या घरी कौटुंबिक सहकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली असता. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरद्वारे दिली.


माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले असल्यामुळे गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी नियमानुसार स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत क्वारंटाईन व्हावे, असे ट्विट मुनगंटीवार यांनी केले आहे. चंद्रपूरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी कौटुंबिक सहकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांनी दोन दिवसीय विधीमंडळ अधिवेशनला जाणे टाळले होते. त्यानंतर त्यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

यानंतर कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण शोधण्यासाठी मुनगंटीवार यांच्या अन्य काही चाचण्या करुन घेतल्या जात आहेत. सध्या तरी त्यांच्यावर घरीच उपचार केले जाण्याची माहिती कार्यालयाने दिली आहे. तसेच त्यांच्या घरातील अन्य सदस्यांची देखील कोरोना चाचणी केली जाणार आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी नियमानुसार स्वतःची कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी केले आहे.