अमेरिका-चीनमध्ये युद्धसदृश्य स्थिती, रशिया या भागात पाठवत आहे सैन्य


अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने देखील आपल्या तैनात केलेल्या जवानांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया पुर्व चीन सागरामधील आपल्या नौदलच्या व्लादिवोस्तोक तळावर सैन्य संख्या वाढवणार आहे. या लष्करीतळाद्वारे रशिया प्रशांत महासागर, पुर्व चीन सागर, फिलिपाईन्स आखातीच्या भागावर लक्ष ठेवत असते.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू म्हणाले की, पुर्व भागात तणाव वाढत असल्याने सैन्य संख्या वाढवली जात आहे. मात्र त्यांनी कोणत्याही देशाचे स्पष्ट नाव घेतले नाही. त्यांनी नवीन धोका काय आहे व पुर्वेकडे या सैनिकांना कोठे तैनात करणार आहे याचीही माहिती दिली नाही. विशेषज्ञांनुसार, चीनला लागून असलेली सीमा आणि प्रशांत महासागरात वाढत्या तणावामुळे रशिया चिंतेत आहे. त्यामुळे हिताचे रक्षण करण्यासाठी सैनिकांची उपस्थिती वाढवत आहे.

मॉस्कोतील कार्नेगी सेंटरचे विश्लेषक अलेक्झेंडर गब्यूव म्हणाले की, संघर्ष सुरू होण्याआधी रशिया त्या भागात पुरेसे सैन्य असतील, याची काळजी घेत आहे. येणाऱ्या काळात अमेरिका-चीनमध्ये नौदल संघर्ष पाहण्यास मिळू शकतो. अशा स्थितीमध्ये रशिया देखील या क्षेत्रात आपली ताकद वाढण्याचा प्रयत्न करत आहे.

पुर्वेकडील भागात रशिया सैन्याच्या संख्येत वाढ करून अमेरिकेवर निशाणा साधण्यासोबतच व्लादिवोस्तोक शहरावर दावा करणाऱ्या चीनला देखील प्रत्युत्तर देत आहे. दुसरीकडे अमेरिका जपानच्या मदतीने याभागात आपली सैन्य संख्या वाढवत आहे.