सरकारवर कर्जाचा डोंगर, एकूण कर्ज 100 लाख कोटींच्या पुढे


केंद्र सरकारवरील कर्जाचा डोंगर वाढतच चालला असून, जून 2020 अखेरपर्यंत सरकारची एकूण देणेदारी तब्बल 101.3 लाख कोटी रुपयांवर पोहचली आहे. सार्वजनिक ऋण बाबत जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. जून 2019 मध्ये देणेदारी ही 88.18 लाख कोटी रुपये होती. सार्वजनिक कर्ज व्यवस्थापनाच्या तिमाही रिपोर्टनुसार, जून 2020 अखेर सार्वजनिक कर्ज सरकारच्या एकूण थकबाकीपैकी 91.1 टक्के होते.

मार्च 2020 पर्यंत कर्ज 94.6 लाख कोटी रुपये होते. जे जून महिन्यापर्यंत वाढून 101.3 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. कोरोनानंतर हा आकडा वेगाने वाढला आहे. न्यूज18 च्या वृत्तानुसार, या सिक्युरिटीजच्या सुमारे 28.6 टक्के उर्वरित मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षांपेक्षा कमी राहिला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत केंद्र सरकारने 3,46,000 कोटी रुपयांच्या दिनांकित सिक्युरिटीज जारी केल्या आहेत. तर याच कालावधीमध्ये मागील वर्षी हा आकडा 2,21,000 कोटी रुपये होता. केंद्राने एप्रिल-जून 2020 दरम्यान कॅश मॅनेजमेंट बिल जारी करत 80 हजार कोटी रुपये जमवले.