कोरोनाग्रस्त खासदारांची संख्या वाढली, सरकार पावसाळी अधिवेशन लवकर आटोपते घेणार ?


कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत दोन केंद्रीय मंत्र्यांसह जवळपास 30 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कठोर नियम असले तरी देखील खासदारांना कोरोनाची लागण होत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. कोरोना व्हायरसचा धोका पाहता सरकार पावसाळी अधिवेशन लवकर आटोपते घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतचे वृत्त वनइंडियाने दिले आहे.

पावसाळी अधिवेशन हे 14 सप्टेंबर रोजी सुरू झाले असून, याचा कालावधी 1 ऑक्टोंबरपर्यंत आहे. मात्र आता कोरोनाग्रस्त खासदारांची संख्या वाढल्याने अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी कमी केला जाऊ शकतो. भाजप खासदार विनय सहस्रबुद्धे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर चिंता अधिकच वाढली आहे. एक दिवस आधीच सहस्रबुद्धे यांची चाचणी नेगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांनी संसदेत सरकारच्या बाजूने पक्ष देखील ठेवला होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

वनइंडियानुसार, सरकारकडून लॉकडाऊनच्या दरम्यान जाहीर करण्यात आलेली सर्व विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यास, अधिवेशनाचा कालावधी कमी केला जाऊ शकतो.