कोरोना संकटात गमवली नोकरी, सौदीत शेकडो भारतीयांवर भीक मागण्याची वेळ


कोरोना व्हायरसमुळे नोकरी गमवलेल्या 450 भारतीयांवर सौदी अरेबियामध्ये रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थानसह भारतातील विविध राज्यांमधील नागरिकांचा कामगार परवाना समाप्त झाला असल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. पोट भरण्यासाठी रस्त्यावर भीक मागण्यास या कामगारांनी सुरुवात केली. मात्र सौदीच्या प्रशासनाने त्यांना डिटेंशन सेंटरमध्ये पाठवले आहे. डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्यात आलेल्या नागरिकांमध्ये उत्तर प्रदेशमधील 39, बिहारमधील 10, तेलंगानामधील 5, महाराष्ट्र, जम्मू-काश्मिर आणि कर्नाटकमधील प्रत्येकी 4 आणि आंध्र प्रदेशमधील एकाचा समावेश आहे.

या कामगारांचे म्हणणे आहे की, आम्ही हताश परिस्थितीमध्ये अडकलो आहोत. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. आमच्यावर भीक मागण्याची वेळ आली, कारण आम्ही नोकरी गमावली. आता आम्हाला डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

आणखी एका कामगाराने सांगितले की, मागील 4 महिन्यांपासून कठीण संकटातून जात आहोत. पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया आणि श्रीलंकेतील नागरिकांना त्यांच्या देशातील प्रशासनाने घरी जाण्यास मदत केली. मात्र आम्ही येथेच अडकलो आहोत.

सामाजिक कार्यकर्ते आणि एमबीटी नेते अमजद उल्लाह खान यांनी या कामगारांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी आणि सौदीतील भारतीय राजदूत औसफ सय्यद यांना पत्र लिहिले आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवासी भारतीय साहय्यता केंद्राने अमजद यांना ट्विटरवर रिप्लाय दिला असून, कामगारांच्या मदतीसाठी त्यांच्याकडे संपुर्ण माहिती मागितली आहे.