वाळवंटात सुरु होतोय आयपीएल मेळा- स्टेडियमवर रोषणाई

फोटो साभार अम्फिनिटी न्यूज

संयुक्त अरब अमिराती आयपीएल २०२० सामन्यांसाठी सज्ज झाले असून आज सायंकाळी साडेसात वाजता आयपीएल मेळा सुरु होत आहे. या साठी गेली दोन दिवस येथील स्टेडियमवर नयनरम्य विद्युत रोषणाई केली गेली आहे. आयपीएल २०२० चे सामने तीन स्टेडियमवर होणार आहेत. दुबई मध्ये २४, अबुधाबी मध्ये २० तर शारजा येथे १२ सामने होणार आहेत. अबुधाबी मधल्या शेख जाएद स्टेडियम मध्ये सलामी सामना मुंबई आणि चेन्नई मध्ये आज होणार असून मंगळवार पासूनच हे स्टेडियम रोषणाई मध्ये उजळून गेले आहे.

अबूधाबी मधले शेख जायेद स्टेडियम २००४ मध्ये १०० कोटी रुपये खर्च करून बांधले गेले होते.२००६ मध्ये या मैदानावर पाहिला आंतरराष्ट्रीय सामना भारत आणि पाकिस्तान मध्ये झाला होता. या स्टेडियमवर आत्तापर्यंत १३ कसोटी, ४६ वनडे आणि ४५ टी २० आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. भारताने येथे एकही टी २० सामना खेळलेला नाही.

बीसीसीआयने सट्टेबाजी वर नियंत्रणासाठी यंदा फ्रॉड डीटेक्शन सर्व्हिसचा वापर केला असून त्यासाठी स्पोर्टरडार कंपनीशी करार केला आहे. बीसीसीआयचे भ्रष्टाचार विरोधी पथक अगोदरच युएई येथे तैनात केले गेले आहे. दरम्यान चेन्नईचा फलंदाज ऋतुराज पहिल्या सामन्यात खेळणार नाही. त्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला १४ दिवस क्वारंटाइन केले गेले होते. ही मुदत संपली असली तरी त्याच्या अजून दोन टेस्ट निगेटिव्ह येणे भाग असून त्यानंतर त्याला फिटनेस चाचणी सुद्धा द्यावी लागणार आहे.