स्थानिक कामगारांना हुसकून पाक सेनेच्या ताब्यात रुबीच्या खाणी

पाकव्याप्त काश्मीर मध्ये वन्य संपदेवर ताबा मिळविल्यानंतर पाकिस्तानी सेनेने त्यांची नजर येथील रुबी म्हणजे माणकांच्या खाणींवर वळविली आहे. या बहुमुल्य खड्यांचा वापर पाकिस्तानी सेना काश्मिरी जनतेला हिंसेच्या आगीत लोटण्यासाठी करत असून त्यात चीनकडून पाकिस्तान सेनेला सहाय्य केले जात असल्याचे उघडकीस आले आहे.

पाकव्याप्त काश्मीर मधील काही स्थानिक लोकांकडून बाहेर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सेना आणि पाकची आयएसआय या खाणीत काम करणाऱ्या स्थानिक लोकांना हुसकावून लावते आहे आणि खाणींचा ताबा घेते आहे. या खाणींचे ठेके स्थानिक दहशतवादी कमांडरना देण्यात आले आहेत. नीलम घाटीच्या वरच्या भागात नांगीमाली, चित्ताकाठा येथे रुबीच्या खाणी आहेत. या भागात अब्जावधी किमतीचे या मौल्यवान खड्यांचे साठे असून एकट्या चित्टाकाठा येथेच किमान ४५० टन रुबी असावे असा अंदाज आहे.

या भागात वर्षातील सहाच महिने खोदकाम सुरु राहते. हा भाग लाईन ऑफ कंट्रोलच्या जवळ असल्याचे कारण देऊन येथे स्थानिक लोकांना येऊ दिले जात नाही मात्र सहा महिन्यांपूर्वी चीन मधून कामगार आणले गेले आहेत. या खाणीतून माणिक बाहेर काढण्यात एक चीनी कंपनी सुद्धा सामील आहे.ज्या स्थानिकांनी याला विरोध केला ते रहस्यमय रित्या गायब झाल्याचेही सांगितले जाते.

या खाणीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून हत्यारे खरेदी केली जातात तसेच काश्मीर मध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांमार्फत रुबीचे मौल्यवान खडे काश्मीर मधील काही खास लोकांपर्यंत पोहोचविले जातात आणि त्याबदली भारतीय रुपये मिळविले जातात असेही समजते.