म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर हे नवीन नियम जाणून घ्या


जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर याच्या नवीन नियमांबाबत जाणून घेतले पाहिजे. सेबीने एक परिपत्रक जारी करत 2021 पासून लागू होणाऱ्या म्युच्युअल फंडशी संबंधित नवीन नियमांची माहिती दिली आहे. नियमांनुसार, गुंतवणूकदारांची रक्कम ज्या दिवशी म्युच्युअल फंड खात्यात येईल, तेव्हापासूनच नेट एसेट्स वॅल्यू (NAV) लागू होई होईल. सध्या नियमानुसार ज्या दिवशी गुंतवणूकदार 2 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीची ऑर्डर देतात, तेव्हाच NAV लागू होते.

सेबीने अन्य काही नियमांबाबत देखील परिपत्रक जारी केले आहे. यात फंड मॅनेजमेंटवरील लक्ष वाढवण्यास सांगितले आहे. करार करणे, फंड मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट सारख्या महत्त्वाच्या टिम्सवर लक्ष वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच प्रत्येक म्युच्युअल फंडला असे नियम बनवायला हवे, ज्याद्वारे सर्वांची भूमिका आणि जबाबदारी स्पष्ट होईल, असेही म्हटले आहे.

म्युच्युअल फंडच्या डीलिंग रुममध्ये कोणत्याही प्रकारचे हेराफेरी होऊ नये यासाठी सुद्धा परिपत्रक जारी केले आहे. जसे की, डीलिंग डेस्कवर पुरेसे कर्मचारी असावेत, तेथे होणारी सर्व चर्चा रेकॉर्डेड लाईनशी करावी. डीलिंग रुममध्ये मोबाईल फोन अथवा अन्य कम्यूनिकेशन लाईन नसावी. सर्व संभाषण रेकॉर्ड करता येईल अशा टेलिफोन लाइनद्वारे करावे. डीलिंग रुममध्ये केवळ करारासाठीच इंटरनेट असावे. कराराची प्रक्रिया ऑडिट करता येईल याची व्यवस्था असावी. तसेच, कोणी नॉन कंप्लायंस असल्यास म्युच्युअल फंड आपल्या ट्रस्टी बोर्डाला याची माहिती देतील व तेथून सेबीला रिपोर्ट दिला जाईल.