रशियाच्या कोरोना लसीचे दिसले साइड इफेक्ट्स, भारतात येणार आहेत कोट्यावधी डोस


रशियाची कोरोना प्रतिबंधक लस स्पुटनिक-व्ही वर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. ही लस टोचलेल्या 7 पैकी एका व्यक्तीमध्ये याचे साइड इफेक्ट्स जाणवत आहेत. याबाबतची माहिती स्वतः रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी दिली आहे. मुराश्को यांनी सांगितले की, लस घेणाऱ्या जवळपास 14 टक्के लोकांमध्ये याचे साइट इफेक्ट्स जाणवले आहेत. सात पैकी एका व्यक्तीला लस घेतल्यानंतर अशक्तपणा आणि स्नायू वेदना होत असल्याचे सांगितले जात आहे. मुराश्को यांचे म्हणणे आहे की याबाबतची माहिती आधीपासूनच होती व दुसऱ्या दिवशी ते ठीक झाले.

या लसीच्या क्लिनिकल ट्रायलचे सुरुवातीचे परिणाम द लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित झाले होते. 76 लोकांना दोन टप्प्यात लस देण्यात आली होती. यात 21 दिवस परीक्षण केल्यानंतर लस सुरक्षित असल्याचे म्हटले होते. जर्नलमध्ये लसीच्या साइड इफेक्ट्सबाबत देखील सांगण्यात आले होते. जर्नलनुसार साइड इफेक्टमध्ये 58 टक्के लोकांना इंजेक्शनच्या जागी वेदना होत असल्याचे जाणवले. तर 50 टक्के लोकांना ताप, 42 टक्के लोकांना डोकेदुखी, 28 टक्के लोकांना अशक्तपणा आणि 24 टक्के लोकांना स्नायूत वेदना जाणवल्या.

लँसेंट जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात दावा करण्यात आला होता की, 42 दिवसांमध्ये स्वयंसेवकांमध्ये दिसलेली लक्षण खूपच साधारण होती व त्यांच्यात कोणतेही गंभीर साइड इफेक्ट्स आढळले नाही. दरम्यान, रशियाच्या या लसीचे 10 कोटी डोस नोव्हेंबरपर्यंत येणार असल्याचे सांगितले जाते. रशियाने डॉ. रेड्डीज लॅबसोबत करार केला आहे.