नॅशनल इंफॉर्मेटिक्स सेंटर्सच्या कॉम्प्युटर्सवर सायबर हल्ला, PM-NSA सह अनेकांची होती माहिती


काही दिवसांपुर्वी चीनकडून सोशल मीडियाद्वारे हेरगिरी केली जात असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता एक मोठा खुलासा झाला आहे. नॅशनल इंफॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) अनेक कॉम्प्युटर्सवर हॅकर्सने हल्ला केला आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल टीमने या प्रकरणात तक्रार दाखल करत, तपास सुरु केलेला आहे. एनआयसीच्या कॉम्प्युटर्समध्ये भारताची सुरक्षा, नागरिक, मोठमोठ्या व्हीआयपी लोकांशी संबंधित डेटा उपलब्ध असतो. यात पंतप्रधानांपासून ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा देखील डेटा असतो.

आज तकच्या वृत्तानुसार, हा सायबर हल्ला बंगळुरूच्या एका कंपनीतून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एनआयसीच्या कर्मचाऱ्यांना एक मेल आला होता. ज्यांनी त्या मेलवर क्लिक केले, त्यांचा डेटा गायब झाला. या सायबर हल्ल्यात जवळपास 100 कॉम्प्युटर्सला निशाणा बनविण्यात आला. ज्यात काही एनआयसीचे व काही आयटी मंत्रालयाचे होते.

एनआयसीकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. हा ईमेल बंगळुरूच्या अमेरिकन कंपनीकडून आला होता. ज्याची माहिती आयपी अ‍ॅड्रेसद्वारे प्राप्त झाली.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच चीनच्या काही कंपन्या पंतप्रधान, राष्ट्रपतींसह देशातील जवळपास 10 हजार महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवून असल्याची माहिती समोर आली होती.