राज्य सरकारने केली 50 पेक्षा अधिक आयपीएस अधिकाऱ्यांची बदली, अमिताभ गुप्ता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त


मागील काही दिवसांपासून राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरूच असून, आता राज्य सरकारने पोलीस दलात मोठा बदल करत 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची बदली केली आहे. गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांची देखील बदली करण्यात आली असून, आता त्यांना पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) म्हणून मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे.  पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुख यांना नियुक्त करण्यात आले आहे.

पोलिस उपायुक्त (अंमली पदार्थ विरोधी सेल) शिवदीप लांडे यांची मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून पदोन्नती झाली आहे. तर गृह विभागाच्या प्रधान सचिव (विशेष) पदी अमिताभ गुप्ता यांच्या जागी विनीत अगरवाल यांची वर्णी लागली आहे.

गुरुवारी सायंकाळी करण्यात आलेल्या या बदलीमध्ये आतापर्यंत 41 आयपीएस अधिकाऱ्यांना नवीन पोस्टिंग देण्यात आली असून, इतर अधिकाऱ्यांना अद्याप पोस्टिंग देण्यात आलेली नाही.