विमानतळाप्रमाणे रेल्वे स्टेशनवर लागणार यूजर चार्ज, तिकिट महागणार!


पुढील काही दिवसांमध्ये रेल्वे तिकिटाचे दर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेने व्यस्त स्टेशनवर यूजर चार्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. यूजर चार्जमुळे रेल्वे तिकिट महागणार आहे. भारतीय रेल्वेचे चेअरमन वीके यादव म्हणाले की, ज्या रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढत आहे अशा ठिकाणी काही प्रमाणात यूजर चार्ज आकारला जाणार आहे. या स्टेशन्सला जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील 10 ते 15 टक्के रेल्वे स्टेशनवर यूजर चार्ज लावला जाणार आहे. सध्या भारतीय रेल्वेचे जवळपास 7 हजार रेल्वे स्टेशन आहेत. यानुसार जवळपास 1 हजार स्टेशनवर यूजर चार्ज आकारले जाईल.

यूजर चार्ज हे देण्यात येणाऱ्या सुविधेसाठी आकारले जाते. सध्या विमानतळावर अशाप्रकारचे शुल्क आकारले जाते. विमानतळावर लावले जाणारे हे शुल्क एअर तिकिटात जोडले जाते. म्हणजेच एअर तिकिटासाठी तुम्ही जे शुल्क भरता त्या यूजर चार्जचा आधीपासूनच समावेश असतो. याचा अर्थ रेल्वे स्टेशनवर यूजर चार्जेस आकारले गेल्यानंतर रेल्वे तिकिटाचे दर वाढतील.