फेसबुकची फोनच्या कॅमेऱ्याद्वारे इंस्टाग्राम युजर्सवर पाळत, खटला दाखल


सोशल मीडिया कंपनी फेसबुकवर पुन्हा एकदा इंस्टाग्राम युजर्सवर पाळत ठेवल्याच्या आरोपाखाली खटला दाखल करण्यात आला आहे. आरोप आहे की फेसबुक कोणत्याही परवानगी शिवाय युजर्सच्या फोनमधील कॅमेऱ्याद्वारे पाळत ठेवत आहे. जुलै महिन्यात देखील अशाच प्रकारचे आरोप फेसबुकवर करण्यात आले होते.

रिपोर्टनुसार, इंस्टाग्रामचा उपयोग करत नसतानाही फोटोशेअरिंग अ‍ॅप आयफोन कॅमेऱ्याचा एक्सेस घेत आहे. फेसबुकने हे आरोप फेटाळले होते व हे बग मुळे झाल्याचे म्हटले होते.

आता सॅन फ्रॅन्सिस्कोच्या फेडरल कोर्टात इंस्टाग्राम युजर्स ब्रिट्टिनी कॉन्डिटीने कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, अ‍ॅपद्वारे कॅमेऱ्याचा वापर जाणीवपुर्वक व युजर्सचा संवेंदनशील व महत्त्वपुर्ण डेटा जमा करण्यासाठी हेतूपुर्वक केला जात आहे. फेसबुक युजर्सचा अगदी खाजगी आणि जिव्हाळ्याच्या गोष्टींचा डेटा देखील जमा करत आहे. यात घरातील खाजगी गोष्टींचा देखील समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फेसबुकने या प्रकरणावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. दरम्यान, मागील महिन्यात फेसबुकवर बेकायदेशीररित्या फेशियल-रिकॉग्निशन टेक्नोलॉजीचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर फेसबुकने कंपनी फेशियल-रिकॉग्निशन टेक्नोलॉजी वापर नसल्याचे म्हटले होते.