पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी सोशल मीडियावर ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ ट्रेंडिंग


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 70 वा वाढदिवस आहे. भाजपकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर देखील मोदींच्या वाढदिवसाचे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. रात्री 12 वाजल्यापासूनच #HappyBdayNaMo, ट्रेंड होत आहे. मात्र यासोबतच आणखी एक हॅशटॅग मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने विशेष ट्रेंड होत आहे, तो म्हणजे #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस.

भारतातील तरुण-तरुणी, खासकरून विद्यार्थी या हॅशटॅग्सचा वापर करून आपला विरोध नोंदवत आहेत. कोरोना महामारीमुळे भारतीय अर्थव्यस्था संकटात सापडली आहे. एप्रिल-जून तिमाहीत देशाची जीडीपी 23.9 टक्क्यांनी खाली घसरली आहे. जी मागील 40 वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे.

एवढेच नाही तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनोमीच्या आकड्यांनुसार भारतातील शहरी बेरोजगारी 8.32 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. लॉकडाऊनमध्ये कोट्यावधी लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. 30 वर्षांखालील जवळपास 40 लाखांपेक्षा अधिक तरुणांनी रोजगार गमवला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी तरुण #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस ट्विट करत आपला विरोध नोंदवत आहे.

याआधी देशातील वेगवेगळ्या भागातील युवकांनी रात्री 9 वाजता 9 मिनिटांनी टॉर्च, मोबाईल फ्लॅश आणि दिवे लावत सांकेतिक विरोध प्रदर्शन केले होते. आता  #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस आणि #NationalUnemploymentDay हॅशटॅग वापरून आपले म्हणणे मांडत आहेत.