सर्व लोक ‘भाभीजी पापड’ खाऊन बरे झाले का?, राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांना संजय राऊत यांचे उत्तर


राज्यसभेत महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या खासदारांना आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिले आहे. कोरोना व्हायरस संसर्गावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या निवेदनावर चर्चा करताना संजय राऊत म्हणाले की, मी सदस्यांना विचारू इच्छितो की एवढी लोक बरे कसे झाले ? सर्व लोक भाभीजी पापड खाऊन बरे झाले का ? असा सवाल त्यांनी केली.

संजय राऊत म्हणाले की, ही एक राजकीय लढाऊ नसून, लोकांचे प्राण वाचवण्याची लढाई आहे. माझी आई आणि भाऊ दोघे कोरोना संक्रमित आहेत. महाराष्ट्रातील अनेक लोक बरे होत आहेत. आज धारावीची स्थिती नियंत्रणात आहे. डब्ल्यूएचओने बीएमसीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. मी हे मुद्दे मांडत आहे कारण काही सदस्य महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहे.

संजय राऊत यांनी अर्थव्यवस्थेवरून देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, नफा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे खाजगीकरण करू नका. नोटबंदी आणि कोव्हिड-19 महामारीमुळे आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. अशा स्थितीमध्ये सरकार एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी आणि बरच काही बाजारात विकण्यासाठी सेल लावत आहे.