जगातील श्रीमंत देशांनी खरेदी केले कोरोना लसीचे 50% डोस, रिपोर्टमध्ये दावा


संपुर्ण जग पुन्हा आयुष्य पुर्वपदावर येण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीची वाट पाहत आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र लस बाजारात उपलब्ध होण्याच्या आधीच अनेक श्रीमंत देशांनी लसीचा साठा करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय संस्था ऑक्सफॅमने आपल्या अभ्यासात दावा केला आहे. जगाच्या 13 टक्के लोकसंख्या असलेल्या श्रीमंत देशांनी कोव्हिड-19 लसीचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक डोस खरेदी करून साठा केला आहे.

श्रीमंत देशांनी लस बनविण्याचे काम करणाऱ्या कंपन्यांसोबत मिळून अनेक करार केले आहेत. ऑक्सफॅमच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, एनालिटिक्स कंपनी एअरफिनिटीद्वारे जमा करण्यात आलेल्या डेटानुसार अंतिम टप्प्यात असलेल्या 5 लसींसोबत करार करण्यात आला आहे. असे श्रीमंत देश ज्यांची लोकसंख्या एकूण जगाच्या 13 टक्के आहेत, त्यांनी 50 टक्क्यांपेक्षा अधिक लस खरेदी केली आहे.

ऑक्सफॅम अमेरिकेचे रॉबर्ट सिल्वरमॅन म्हणाले की, आयुष्य वाचवणारी लस तुमच्यापर्यंत कधी पोहचेल हे तुम्ही कोठे राहता आणि तुमच्याकडे किती पैसा आहे यावर निर्भर अशते. एक सुरक्षित आणि प्रभावशाली लस तयार होणे खूप महत्त्वाचे आहे. त्यापेक्षा गरजेचे आहे की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. ही लस सर्वांसाठी उपलब्ध व्हावी. ऑक्सफॅमने ज्या लसींचा अभ्यास केला आहे त्यात अ‍ॅस्ट्रेजेनका, स्पुटनिक-व्ही, मॉडर्ना, फाइजर आणि साइनोवॅक्सचा समावेश आहे. या 5 कंपन्यांमध्ये लसीचे 590 कोटी डोस बनविण्याची क्षमता आहे. प्रत्येक व्यक्तीला दोन डोस अशाप्रकारे जगातील 300 कोटी लोकांसाठी ही लस पर्याप्त आहे.

यातील जवळपास 270 कोटी डोस श्रीमंत देशांनी खरेदी केले आहेत. ज्या श्रीमंत देशांनी या लसीचा साठा करण्याची योजना बनवली आहे. त्यामध्ये अमेरिका, ब्रिटेन, यूरोपियन यूनियन, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, मकाऊ, जपान, स्विर्झलँड आणि इस्त्रायल सारख्या देशांचा समावेश आहे. इतर लसीचे डोस भारत, बांगलादेश, चीन, ब्राझील, इंडोनेशिया आणि मॅक्सिकोमध्ये विकले जातील.